1 2 3 4

        पशुपालन आणि दूध व्यवसाय देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. अत्यल्प दरात उच्च प्रतीचे पूरक अन्न पुरविण्यासह या व्यवसायामुळे ग्रामीण भागात मोठा रोजगारही उपलब्ध झाला आहे. विशेषत: भूमिहीन शेतमजूर, अवर्षण क्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामीण महिलांना दूध व्यवसायामुळे कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी मदत होते. जगातील एकूण दूध उत्पादनापैकी १३ टक्के उत्पादन भारतातून होते. म्हशींच्या बाबतीत तर देशाचा जगात प्रथम क्रमांक लागतो. जगातील म्हशींच्या एकूण संख्येपैकी ५७ टक्के वाटा भारताचा आहे. भारतातील फार मोठा शाकाहारी वर्ग दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या आहारात उपयोग करतो. त्यामुळे या व्यवसायाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक नवा आयाम दिला आहे. या क्षेत्रातील विकासामुळे बेरोजगारी, गरिबी इत्यादि प्रश्न बऱ्याच अंशी सुटत आहेत. अलिकडील काळात तर दूध व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे कारण या व्यवसायाशी निगडित शक्य तितक्या चांगल्या तांत्रिक प्रणाली वापरल्या जात आहेत.

        चांगल्या दर्जामुळे भारतीय दुधाला जगातील विविध भागांतून मागणी आहे. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत भारतातील दुधाचे उत्पादन सरासरी ११२-१२० मे. टन असे राहीले आहे. आगामी काळात यापेक्षाही अधिक उत्पादनांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने दुधाबाबत खाजगीकरणाची प्रक्रिया प्रचंड वेगाने सुरू आहे. खाजगीकरणाच्या या मांदियाळीत सामान्य शेतकरी आणि त्यातही विशेषत: महाराष्ट्रातील दूध व्यावसायिक दर, गुणवत्ता, सुमार अनुवंशाची जनावरे, स्पर्धात्मक पुरवठा, चारा टंचाई अशा अनेक समस्यांना तोंड देत आहेत. यावर प्रत्येक दूध घटक सजग व्हावा.;त्याबाबतचे विचार, समस्या निवारण सार्वत्रिकरित्या व्हावे, याकरिता MPDFA ची निर्मिती झाली.


        मित्रहो, महाराष्ट्रातील दूध व्यावसायिकांना दूध उत्पादनात येणाऱ्या अडचणी, समस्या आदींच्या सोडवणुकीसाठी समग्र चर्चासत्रे घडावीत; त्यायोगे या व्यवसायातील जागतिक पातळीवर होणारे बदल व आधुनिकतेचे मार्गदर्शन मिळावे इ. उद्दिष्टांनुसार एक सर्वलक्षी व्यासपीठ असावे, या विचाराने MPDFA (महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. देशपातळीवर AIPDFA ही दूध व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांसाठी कर्यरत असणारी संस्था आहे. पंजाब, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश यांसह देशातील अनेक राज्यांमध्ये AIPDFA शी संलग्न असणाऱ्या राज्यस्तरीय संस्था आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही दूध व्यावसायिकांची संस्था असावी, या हेतूने MPDFA ची बांधणी करण्यात आली आहे. MPDFA ची कार्ये AIPDFA शी समांतर असून उद्दिष्ट्येही समान आहेत.