महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाची भरभराट होण्यासाठी कार्यरत असताना संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक श्री. रणजीतसिंह देशमुख यांनी अनेक नवीन संकल्पना राबविल्या आहेत. कमीत-कमी खर्चात आधुनिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी 'मॉडर्न डेअरी फार्म' ही नवीन संकल्पना त्यांनी मांङली आहे. कमी खर्चात शक्य असणारे बदल करायला शेतकरी उत्साहाने तयार होतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून रणजीतसिंह देशमुख हे दुग्ध व्यावसायिकांशी संबंधित कामकाजात व्यस्त आहेत. त्या माध्यमातून अनेक नवीन संकल्पना मांडताना सर्वप्रथम मुक्त संचार गोठ्याचा अभिनव प्रयोग त्यानी केला. हा प्रयोग दुग्ध व्यवसायाला नवी उमेद देत असल्याचे पाहून संगमनेर तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. अल्पवधीत तालुक्यातील मुक्त संचार गोठ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
मुक्त संचार गोठा संकल्पनेचे पुढचे पाऊल म्हणजे मॉडर्न डेअरी फार्म.
दुग्ध व्यवसायात नवी आशा देणारी् मॉडर्न डेअरी फार्मची कल्पना विशेषत: आधुनिक तंत्रज्ञान- कमी उत्पादन खर्च आणि योग्य व्यवस्थापन या त्रि:सुत्रीवर आधारित आहे. मॉडर्न डेअरी फार्ममध्ये गोठ्याची विशिष्ट आणि शास्त्रोक्त रचना असते. गायींची विभागणी, योग्य वातावरण, वासरांची वेगळी सुविधा, मूरघास,मिल्किंग मशीन, गव्हाण इत्यादींचा अंतर्भाव असणारी मॉडर्न डेअरी फार्म संकल्पना तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरते आहे.
या संकल्पनेनुसार रणजीतसिंह देशमुख यांनी इच्छुक व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले आहेत. गोठ्याची योग्य डिझाईन, आधुनिक यंत्रणेचा वापर ,कमीत कमी मनुष्यबळ व अधिक उत्पादन, व्यवसायाचा चोख हिशेब, गायींची निवड व त्यांचे संगोपन, चारा व्यवस्थापन इत्यादींबाबत अत्याधुनिक माहिती आणि प्रशिक्षण प्रत्यक्ष गोठ्यामध्ये दिले जाते. दुग्ध व्यवसाय वृध्दीच्या या प्रयत्नांना मूर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी सर्व दूध उत्पादकांनी मॉडर्न डेअरी फार्मचा अवलंब करावा व या प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे.




