राज्यभर दुष्काळाच्या परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना भीषण चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादनातील अडचणींवर संशोधन करणार्‍या रणजीतसिंह देशमुख यांनी शासनाला बगॅस चार्‍याचा पर्याय सुचविला आहे. या चार्‍यासाठी येणारा खर्च अत्यंत कमी असून काही छोट्या कृतीतून असा चारा बनवणे सहज शक्य आहे. देशभरात साखर उद्योगात महाराष्ट्राची गणना सर्वाधिक सहकारी कारखान्याचे राज्य म्हणून केली जाते. प्रत्येक साखर कारखान्यात गाळपानंतर मोठ्या प्रमाणावर बगॅसचा साठा शिल्लक असतो. बगॅसला तसे निष्क्रिय मानले जाते. मात्र याच बगॅसच्या सहाय्याने जनावरांसाठी चांगल्या प्रतीचा चारा तयार करता येऊ शकतो व दुष्काळी परिस्थितीत दूध उत्पादक शेतकर्‍यांचा हा प्रश्न सुटू शकतो, असे प्रतिपादन रणजीतसिंह देशमुख यांनी केले आहे. बगॅस चार्‍यासाठी ऊसाचा चोथा, मळी ( १० ते १५ टक्के ), युरिया ( २ टक्के ), मीठ ( १ टक्का ), खनिज किंवा मिनरल मिक्श्चर ( १ टक्का ) आणि प्रति १०० किलोसाठी २५ ग्रॅम 'अ' जीवनसत्व आवश्यक असते. साधारणपणे १०० लिटर पाण्यात १ किलो युरिया व १ किलो मीठ टाकून मिश्रण करावे. त्यात १५ लिटर मळी किंवा दीड - दोन किलो गूळ टाकून मिश्रण एकजीव करावे. ( असा चारा बगॅसऐवजी गव्हाचा किंवा तुरीचा भुसा / काड/ बाजरीच्या बणग्या वा आंबा, अंजन, झाडांचा पाला इत्यादींच्या माध्यमातूनही करता येतो )
         बगॅसचा किंवा गहू - तुरींच्या भुश्याचा १० ते २० से.मी. जाडीचा थर करावा. त्यावर तयार झालेले मिश्रण शिंपडावे. त्याचवेळी २५ ग्रॅम 'अ' जीवनसत्व व १ किलो खनिज मिश्रण मधून - मधून शिंपडावे. सर्व मिश्रण फावड्याने एकजीव करत रहावे. शक्यतो युरियाचे प्रमाण कमीत कमी असावे. त्यासाठी युरियाची टक्केवारी वजन करूनच ठरवावी. असे खाद्य तीन दिवस अर्धा किलो, नंतर तीन दिवस १ किलो व नंतर तीन दिवस २ किलो प्रतिदिन याप्रमाणे द्यावे. सुरुवातीला काही जनावरे हे खाद्य खात नाहीत; मात्र सवयीनंतर खातात. खाद्य रुचकर होण्यासाठी एखाद्या धान्याचा भरडा किंवा पेंडही मिसळता येते. हे खाद्य दुभत्या जनावरांना हिरव्या चार्‍याच्या अधिक प्रमाणाबरोबर थोडक्यात द्यावे. एक वर्षाच्या आतील वासरांना हे खाद्य देऊ नये. एकदा तयार केलेले खाद्य शक्यतो त्याच दिवशी दिले जाणे अपेक्षित आहे.



        तीन ते चार संकरित गायी किंवा म्हशींना वर्षभर हिरवा चारा पुरवण्यासाठी १ एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी. या क्षेत्रामध्ये १० गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायु संकरीत नेपियर, १० गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायु लसूणघास आणि उरलेल्या २० गुंठे क्षेत्रावर हंगामानुसार मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम यासारख्या चारा पिकांचे उत्पादन मिळेल. यामुळे जनावरांना दररोज विविध प्रकारचा चारा देणेदेखील शक्य होईल. तीन वर्षांनंतर या क्षेत्रातील पिकांची फेरपालट करावी. संकरित नेपियर आणि लसुणघास काढून त्यांच्या ठिकाणी हंगामी पिके, तर हंगामी पिकांच्या ठिकाणी संकरीत नेपियर आणि लसूणघास यांची लागवड करावी. यामुळे जमिनीचा कस टिकून राहिलच; शिवाय चारा उत्पादनही भरपूर मिळेल. चाराकुट्टी यंत्रांच्या सहाय्याने कुट्टी केलेला चारा जनावरांना गव्हाणीतूनच द्यावा. कुट्टी न करता जनावरांना दिल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण २० ते ४० टक्के राहते. चारा गव्हाणीऐवजी जमिनीवर टाकून दिल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण वाढते.
        मूरघास बनविण्यासाठी जी पिके आपल्याकडे उपलब्ध असतील अशा चारा पिकांची कापणी, चारा पिके फुलोऱ्यात असताना करावी. अशा कापलेल्या चाऱ्याची कडबाकुट्टी यंत्राच्या सहाय्याने कुट्टी (तीन - चार सें.मी. लांबीचे तुकडे) करून घ्यावी. बारीक तुकडे केलेला चारा खड्ड्यामध्ये भरण्यास सुरुवात करावी. हिरव्या चाऱ्याचा २० - २५ सें. मी. थर देऊन तो धुमसाच्या सहाय्याने व्यवस्थित दाबावा, जेणेकरून त्यामध्ये अडकलेली हवा निघून जाते. अशा प्रकारे खड्डा भरून घेताना चारा कुट्टीमध्ये अर्धा टक्का मीठ व एक टक्का युरिया मिसळावा; जेणेकरून मूरघासाची चव व पोषणमुल्य वाढते. शेवटी खड्डा पूर्णपणे भरल्यावर दोन - तीन फूट जाड ऊसाचे काडण/ बगेस किंवा जाड तणस यांचा थर देऊन ओली माती व शेणाचे लिपण देऊन खड्डा हवाबंद करावा किंवा मोठ्या आकाराच्या पॉलीथिनने मूरघास खड्ड्याचे तोंड झाकून हवा बंद करावे. अशा प्रकारच्या खड्ड्यात मूरघास सहा आठवड्यात तयार होतो. असा मूरघास एक वर्षापर्यंत साठून राहू शकतो.
        उत्तम मुरघासाचा रंग हा हिरवट पिवळा असा असतो. अशा प्रतीचा मूरघास अत्यंत चविष्ट व बुरशीविरहित असतो. यास एक वैशिष्टपूर्ण असा सुवास असतो. अशा प्रतीच्या मुरघासाचे पोषणमूल्य हे हिरव्या चार्‍याच्या पोषणमुल्याइतकेच असते.
        पावसाळ्यात मुबलक प्रमाणात वाढणारा हिरवा चारा व चारापिके आपण या पद्धतीने संवर्धन करून वर्षभर उपलब्ध करू शकतो. हिरव्या चार्‍याचा होणारा अपाय टाळता येतो. मूरघास सुवासिक व चविष्ट असल्यामुळे जनावरे यास आवडीने खातात. एकदा तयार झाल्यावर मूरघास हा वर्षभर उत्तम स्थितीत राहू शकतो व हिरवा चारा टंचाईच्या काळात पुरवला जाऊ शकतो. पावसाळ्यात उगवणार्‍या अतिरिक्त चार्‍याचे आपण या पद्धतीने योग्य व्यवस्थापन करू शकतो. अशा प्रकारे हिरवा चारा जेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, तेव्हा त्याचे मुरघासाच्या रुपाने संवर्धन करून आपण जनावरास हिरवा चारा टंचाईच्या काळात पुरवठा करावा, जेणेकरून पशुधनापासून मिळणारे उत्पादन कमी न होता वाढत जाईल. यासंबधी वेळोवेळी पशुआहार तज्ञांचा सल्ला घ्यावा.